पैठण- गंगापूर तालुक्यातील भूगर्भ कोरडा ठाक ! पाण्याच्या टँकरला ९८ किलोमीटरचा फेरा !

Foto
 औरंगाबाद: जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष किती गंभीर आहे, याचा अंदाज टॅंकरच्या फेऱ्यावरून लावला जाऊ शकतो.  पैठण आणि गंगापुर तालुक्यातील १० गावांना पाणी पुरविण्यासाठी टँकरला तब्बल ९० किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. या गावांच्या परिसरातील तब्बल ५० चौरस किलोमीटरचा भूगर्भ कोरडाठाक पडला आहे. सततच्या दुष्काळाने अशी भयंकर परिस्थिती ओढवल्याचे  दिसून येते. 

 जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, पैठण हे तालुके दुष्काळात होरपळून निघत आहेत. यावर्षी तर पावसाळ्यातही गंगापूर तालुक्यात ५० हुन अधिक टँकर सुरू होते. वैजापूर तालुक्याचीही तशीच परिस्थिती आहे. आता तर जिल्ह्यात टँकरची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. भूगर्भातील पाणी पातळी एवढी खोल गेली आहे की, टँकर भरण्यासाठी विहीरच मिळत नाही. त्यामुळे या दोन तालुक्यातील अनेक गावांना मुधलवाडी एमआयडीसी, वाळूज एमआयडीसीतून पाणीपुरवठा केला जातो. पैठण तालुक्यातील कोळी बोडखा, सानपवाडी या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरला तब्बल ९८ किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो. रांजणगाव दांडगा या गावाला ९० किमी,  कडेठाण बुद्रुक ९२, कडेठाण तांडा ९२, तर मुरमा, लिंबगाव, पाचोड बु या गावांना ८०  किलोमीटरचा फेरा टँकरला घ्यावा लागत आहे. म्हणजेच ५० किलोमीटर परिघातील जमिनीत पाणीच नाही. गंगापूर तालुक्यातील २८ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरला तब्बल साठ किलोमीटरचा फेरा करावा लागतो. सणव या गावाला तब्बल ९८ किलोमीटरचा फेरा टँकरला घ्यावा लागत आहे. सिरे सायगाव ९६, काटेपिंपळगाव ९६, किन्हाळ देरहल ९८, वैरागड ८६, महबूब खेडा -घोडेगाव ८० तर शिरेगाव शिल्लेगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरला तब्बल ८० किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. म्हणजेच या तालुक्यातील पन्नास किलोमीटर चा परीघ कोरडाठाक  पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई गंगापूर तालुक्यात जाणवत आहे. या तालुक्या ९६ गावांना टँकरद्वारे पाणी पुरविले जाते. त्यापैकी तब्बल २८ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकरला ६९ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. गंगापुर तालुक्यातील १२० गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरविले जाते. त्यापैकी तब्बल ३८ गावांना पाणी देण्यासाठी टँकरला साठ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. दुष्काळाचे हे भीषण वास्तव मन सुन्न करणारे आहे.

सततच्या दुष्काळाचा फटका
 जिल्ह्याला गेल्या पाच-सहा वर्षांपासून दुष्काळाचा फटका बसतो आहे. २०१२ नंतर या वर्षी तिसरा भीषण दुष्काळ जिल्ह्यात पडला आहे. त्यामुळे सर्वच तालुक्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्जन्यमान कमी कमी होत गेल्याने भूगर्भात पाणी मुरत नाही. त्यामुळे मैलोन मैल पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते.  सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत तर भूगर्भात दोनशे अडीचशे फूट खोल पाण्याचा मागमूस लागत नाही. एकंदरीत दुष्काळाने भूगर्भातील पाणी जवळपास संपल्यातच जमा आहे.